मुंबई (वृत्तसंस्था) कोविड-१९ विषाणूच्या प्रतिकारासाठी सर्वात महत्वाचा घटक असणार्या स्वच्छतेच्या प्रचार-प्रसारासाठी नियुक्त करण्यात आलेल्या राज्यातील स्वच्छाग्रहींना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याचा महत्वाचा निर्णय पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी घेतला आहे. याबाबतच शासन निर्णय जाहीर झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, गत सुमारे एक वर्षापासून कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाचा प्रकोप सुरू आहे. याच्या प्रतिकारातील एक सर्वात महत्वाचा घटक हा अर्थातच स्वच्छतेशी संबंधीत आहे. यामुळे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने २० डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागात भरण्यात येणार्या स्वच्छाग्रहींच्या नियुक्तीला मुदतवाढ मिळावी अशी मागणी पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याने केली होती. याला राज्य शासनाने मान्यता दिल्यामुळे ३१ मार्च २०२१ पर्यंत स्वच्छताग्रहीच्या नियुक्त्या करता येणार असल्याचा निर्णय सरकारने एप्रिल २०२० मध्ये घेतला होता. या अनुषंगाने राज्यात स्वच्छाग्रहींच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून याची मुदत ही ३१ मार्च २०२१ रोजी संपली आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रकोप अद्यापही संपलेला नसल्यामुळे राज्यातील २७ जिल्ह्यांमधील स्वच्छाग्रहींच्या नियुक्तीसाठी मुदतवाढ मिळावी अशी भूमिका पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी घेतली. यानुसार आता स्वच्छाग्रहींना तीन महिने म्हणजे ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ प्रदान करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाला असल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.