जामनेर (प्रतिनिधी) जामनेर-बोदवड रस्त्यावरील मलदाभाडी फाट्याजवळ झालेल्या विचित्र अपघातात जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकासह तीन जण जागीच ठार झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री सव्वाआठला ही घटना घडली.
मृतांमध्ये वाडीकिल्ला (ता. जामनेर) येथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर त्र्यंबक पारधी (४२, रा. मालदाभाडी, ता. जामनेर), सुनील शांताराम भोई (४५, रा. जामनेर रोड, बोदवड) आणि दत्तू रामा माळी (३०, रा. माळी वाडा, बोदवड) यांचा समावेश आहे. सुनील भोई व दत्तू रामा माळी हे दोघे जण बोदवडहून जामनेरकडे दुचाकीने येत होते. त्याचवेळी वाडी किल्ला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर त्र्यंबक पारधी हे त्यांच्या दुचाकीने वाडी किल्ला येथून मालदाभाडीकडे येत होते. दोघा दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. याच वेळी पाठीमागून आलेल्या कारने दोघा दुचाकींना धडक दिली. त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
या विचित्र अपघातात सुनील भोई, दत्तू माळी व ईश्वर पारधी या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील तीन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना बोदवड येथे उपचारासाठी नेण्यात आले. दुचाकी एकमेकांना धडकल्या की कारने दुचाकींना धडक हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघाताची माहिती मिळताच जामनेर येथून जालमसिंग राजपूत रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी पोहोचले. मालदाभाडी, नवीदाभाडी व वाडीकिल्ला येथील ग्रामस्थांनी मदतकार्य केले. तीनही मृतदेह रात्री जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. या ठिकाणी नातेवाइकांनी गर्दी केली होती.