जालना (वृत्तसंस्था) जालना शहरात खळबळ उडवून देणाऱ्या गजानन मच्छिंद्रनाथ तौर (३२) याच्या खून प्रकरणातील संशयित तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मण गोरे (रा.खरपुडी), रोहीत नरेंद्र (ताटी) पामुलवार (रा.नांदेड, ह.मु.लोहकरेनग र, अंबड) व भागवत डोंगरे (रा. खरपुडी) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. यातील भावगत डोंगरे हा चाकूहल्ल्यात गंभीर जखमी असून, त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भावगत डोंगरे व गजानन तौर यांच्यातील वादातूनच हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी सांगितले, की गजानन तौर याची सोमवारी मंठा चौफुली परिसरात पाच संशयितांनी भरदिवसा गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणी ज्ञानेश्वर मांगडे याच्या फिर्यादीवरून पाच संशयितांवर तालुका ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, तौर याच्यावर गोळ्या झाडणारा एक संशयित छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे संशयित रोहीत नरेंद्र (ताटी) पामुलवार यास छत्रपती संभाजीनगर येथून आज अटक केली. रोहीत पामुलवार हा मूळचा नांदेड येथील असून, तो सध्या अंबडच्या लोहकरेनगरात वास्तव्यास आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी पिस्तुलही जप्त केले आहे.
या प्रकरणातील अन्य एक संशयित लक्ष्मण गोरे यास पोलिसांनी घटनेच्या दिवशीच पळून जात असताना ताब्यात घेतले होते. तर भागवत डोंगरे यालाही रात्री उशिरा ताब्यात घेतले होते. तो सोमवारी झालेल्या फायरिंगच्या घटनेदरम्यान गजानन तौर याने केलेल्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील इतर दोघांचा शोध सुरू आहे.
















