जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कांचन नगरमधील गोळीबार प्रकरणी तीन संशयित आरोपींना शनीपेठ पोलीसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी नुकतीच पत्रकारांशी बोलतांना दिली आहे.
या हल्ल्यात जखमी झालेला तरूण आकाश सपकाळे आणि जखमी झालेला संशयित आरोपी विकी अलोने या दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या गुन्ह्याप्रकरणी विकी उर्फ मयूर दिपक अलोने, सोनू अशोक सपकाळे, बापू आकाश सपकाळे यांना शनीपेठ पोलीसांनी अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी दिली आहे.
असा झाला गोळीबार
कांचन नगरमधील आकाश सपकाळे या तरूणावर आज सकाळी आठच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी थेट घरात शिरून गोळीबार केला होता. यात सुदैवाने कुणी जखमी झाले नाही. परंतू आकाशच्या उजव्या हाताच्या करंगळीला जखम झाली होती. यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. आकाशच्या कुटुंबीयांनी प्रतिकार केल्याने हल्लेखोरांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पायरीवरून पाय घसरून तो पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला. दुसरीकडे घरात ४ काडतूस पडल्या असून घरा बाहेर १ गावठी कट्टा आणि १ काडतूस पोलिसांना आढळून आले होते.
फायरिंगचा आवाज आल्यानंतर दोघांमध्ये झटापट
विकी उर्फ मयूर दिपक अलोने, सोनू अशोक सपकाळे, बापू आकाश सपकाळे व एक अज्ञात व्यक्ती या चार जणांनी हा हल्ला केल्याची माहिती जखमी आकाश सपकाळे यांनी पोलिसांना दिली होती. विकी अलोने याने गोळीबार केल्यानंतर फायरिंगचा आवाज आला. यानंतर जखमी आकाशचा भाऊ सागर याने संशयित आरोपी विकी अलोने पकडले असता दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत घरात चार फायरिंग झाले. या झटापटीत संशयित विकी हा दरवाजाच्या पायरीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुध्द पडला होता. त्यामुळे त्यांच्या हातातील गावठी पिस्तूल, मोबाईल, रूमाला आणि राऊंड खाली पडले होते.
















