चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्याच्या हरित संजीवनीसाठी वरदान ठरलेल्या वरखडे लोंढे धरणाच्या कामासाठी १२७५ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता शासनाने नुकतीच दिली आहे. त्या पाठोपाठ आता आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या कार्य कुशेलतेच्या बळावर तीन जिल्ह्यांच्या 14 हजार हेक्टर क्षेत्रासाठी लाभदायक असलेल्या पांझण डावा कालव्याचा कॉंक्रीटीकरण, नूतनीकरण या विशेष दुरुस्ती रुपये ३४ कोटी खर्चास शासन मान्यता मिळवली आहे. मागील वर्षी देखील त्यांनी पांझण डावा कालवा व मन्याड उजव्या कालव्याच्या कॉंक्रीटीकरण, नूतनीकरण या विशेष दुरुस्ती साठी ३६ कोटी निधी मंजूर करून त्याचे कामदेखील सुरु झाले होते, त्यात नवीन ३६ कोटींची भर पडल्याने आतापर्यंत एकूण ७० कोटी निधी यासाठी मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांच्या हक्काचे पाणी पोहोचवण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून कायमच होत असलेले प्रयत्न व भरीव योगदानातून तालुका सुजलाम सुफलाम् होत असल्याने तालुक्यातून त्यांचे या धडाडी विकास कामांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पांझण डावा कालवा चे बांधकाम हे १९८४ मध्ये पूर्ण होऊन सिंचन व्यवस्थापनाकडे हस्तांतरीत झालेला आहे. पांझण डावा कालवा हा गिरणा प्रकल्पाच्या डाव्या बाजूला असलेल्या पांझण गावाजवळून सुरु होतो. पांझण डाव्या कालव्याची लांबी ५३.२० किमी असून त्याची संकल्पित वहन क्षमता ७.०९३ क्युमेक (२५० क्युसेक्स) इतकी आहे. पांझण डाव्या कालव्याचे एकूण सिंचन क्षेत्र १२१४१ हेक्टर व वाढ विस्तार अंतर्गत सिंचन क्षेत्र २७८९ हेक्टर क्षेत्र असून एकूण पांझण डावा कालव्यामुळे १४८९० हे. क्षेत्र सिंचनाखाली येते. सदर कालव्याद्वारे नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव, जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगाव व भडगाव या तालुक्यांबरोबरच धुळे जिल्ह्यासही फायदा होतो.
पांझण डावा कालव्यावरील बांधकामांना जवळपास ५० वर्ष पूर्ण झालेली असून पांझण डावा कालवाच्या जुन्या अस्तरीकरणाचे व भरावामधून होत असलेल्या गळतीमुळे कालवा त्याच्या पूर्ण क्षमतेने ने प्रवाहीत होत नव्हता, सद्यःस्थितीत कालवा फक्त १०० क्युसेक्सने प्रवाहीत होत आहे. म्हणजेच निम्मेच पानी शेतकरी वर्गाला मिळत होते. त्याचप्रमाणे आवर्तन कालावधी देखील दुपटीने वाढ होऊन देखील कालव्याचे ४ ऐवजी ३ आवर्तन दिले जात आहे. त्यामुळे चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील शेतक-यांना सिंचन कालावधीमध्ये पाणी उपलब्ध होत नव्हते. व त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये घट देखील झाली आहे.
याबाबात शेतकऱ्यांची हक्काच्या पाण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी जलसंपदा मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे विशेष दुरूस्तीसाठी निधीची ची मागणी लावून धरली होती. आमदार चव्हाण यांनी केलेल्या मागणीनुसार पांझण डाव्या कालव्यावरील तुटलेले UCR अस्तरीकरण व नुतनीकरण्याच्या ३४ कोटी २१ लक्ष रुपयाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याचा जलसंपदा विभागाने दि २० फेबुवारी २०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
सदर पांझण डाव्या कालव्यावरील तुटलेले UCR अस्तरीकरण व नुतनीकरण कामामुळे कालव्यातुन अपेक्षित विसर्ग पुढे क्षमतेने सोडण्यास मदत होईल व तसेच कालव्याची वहन क्षमता वाढून आवर्तन कालावधीत दरवर्षी कालवा फुटण्याचे प्रश्न देखील उपस्थतीत होणार नाहीत व त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. कालवा दुरुस्त केल्यास आवर्तन कालावधी कमी होऊन पाणी बचत होऊन वाढीव आवर्तन देणे शक्य होईल व तसेच तीनही जिल्ह्यातील काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यातून सुटण्यास निश्चितच मदत होणार आहे.
“राज्यातील महायुती सरकार नेहमीच शेतकरी,कष्टकरी यांच्या पाठीमागे उभे राहिले आहे. मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जलयुक्त शिवारासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यातूनच महत्त्वाच्या पांझण डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी ३४ कोटींच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे. त्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आमचे नेते व मार्गदर्शक मा.जलसंपदा मंत्री, आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. मागील वर्षी देखील पांझण डावा कालवा व मन्याड उजव्या कालव्याच्या कॉंक्रीटीकरण, नूतनीकरण या विशेष दुरुस्ती साठी ३६ कोटी निधी मंजूर होऊन त्याचे कामदेखील सुरु झाले आहे, त्यात नवीन ३६ कोटींची भर पडल्याने आतापर्यंत एकूण ७० कोटी निधी यासाठी मिळाला आहे. पुढील कालावधीत गिरणा मन्याड जोड कालवा, माणिकपुंज पाटचारी, मन्याड कालवा दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी मिळवून तालुक्याची सिंचनक्षमता पुनर्स्थापित करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.”.
आमदार मंगेश चव्हाण .चाळीसगाव