जळगाव (प्रतिनिधी) पत्नीसह प्रियकराच्या जाचाला कंटाळून विजय माणिक महाजन ( वय ३२, रा. गेंदालाल मिल) या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकराविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गेंदालाल मिल परिसरात विजय महाजन हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्याच्या पत्नीचे त्याच परिसरातील अजय ज्ञानेश्र्वर शिंदे याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर विजय महाजन व त्याचा भाऊ गणेश महाजन हे दोघ अजय शिंदे याला समजविण्यासाठी गेले असता, त्याने दोघांना शिवीगाळ करीत धमकी दिली. तसेच विजय महाजन याला फोनवरुन तुझ्या पत्नीसोबत माझे प्रेमसंबंध असून मी तिला एक दिवशी पळवून घेवून जाईल, तुझ्याकडून काय होईल ते करुन घे अशी धमकी देखील देत होता.
तसेच मयत विजय याची पत्नी देखील काहीना काही कुरापती काढून पतीसोबत भांडण करीत असायची. दोघांच्या जाचाला कंटाळून विजय याने दि. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली होती. याप्रकरणी मयताची पत्नी व तिचा प्रियकर अजय ज्ञानेश्र्वर शिंदे (रा. गेंदालाल मिल) या दोघांविरुद्ध आत्हत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश शेंडे हे करीत आहे.