पटना (वृत्तसंस्था) चालत्या बसमधून डोकं बाहेर काढणं एका १३ वर्षीय अल्पवयीनं मुलीच्या जीवावर बेतलं आहे. ही घटना मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात घडली आहे. उलटी करण्यासाठी बसमधून डोकं बाहेर काढलेल्या या मुलीचं डोकं समोरुन येणाऱ्या एका ट्रकला धडकलं. या भयंकर घटनेत मुलीचं शीर अक्षरशः धडावेगळं झालं. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तमन्ना आपली आई आणि बहिणीसोबत खांडवा ते इंदोरदरम्यान बसने प्रवास करत होती. तमन्ना चालकाच्या मागील सीटवर बसली होती. सकाळी ८ वाजता प्रवासाला सुरुवात झाली होती. ९.३० वाजण्याच्या सुमारास बस हायवेवर असताना तमन्नाला उलटी होऊ लागली आणि तिने डोकं खिडकीच्या बाहेर काढलं. त्याचक्षणी समोरुन येणाऱ्या ट्रकने तिला धडक दिली आणि मुंडकं उडवलं. “आम्हाला काय झालं काहीच समजलं नाही. अचानक बसमध्ये आणि आमच्या अंगावर रक्त उडालं. काही सेकंदांनी तिची आई घाबरुन ओरडू लागली. ते भयानक होतं,” अशी माहिती बसमधील प्रवाशाने दिली आहे.
तमन्ना आपल्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी चालली होती असं पोलिसांनी सांगितलं आहे. तमन्नाला मोठी अधिकारी करण्याचं तिच्या वडिलांचं स्वप्न होतं. यासाठी त्यांनी तिला एका चांगल्या शाळेतही घातलं होतं. तमन्नाच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.