
जळगाव (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करुन दुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गोपाल टीकमदास पोपाटनी (वय ४२, रा. टीएम नगर, सिंधी कॉलनी) या कापड व्यावसायीकाला ९ लाख ३५ हजारात गंडविले. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांनी दि. १२ जुलै रोजी सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार ऑनलाईन ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील टी.एम. नगर, सिंधी कॉलनी भागातील रहिवासी असलेले कापड व्यावसायिक गोपाल टीकमदास पोपटानी (वय ४२) यांना दि. ३ जून रोजी एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर मॅसेज आला होता. त्यांना ‘एका ग्रुपद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवले. व्यापाऱ्याने त्याला होकार दर्शविल्यानंतर ऑनलाईन ठगांनी त्याला अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्यानंतर एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये देखील अॅड करण्यात आले. या ग्रुपमध्ये अनन्या कुलकर्णी, गुल टेकचंदाणी आणि इतर अॅडमीन हे सक्रिय राहून लोकांना कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी याबद्दल माहिती देऊन त्यांचा विश्वास संपादन करत होते.
भागिदारी करार झाल्याचे सांगितले खोटे
ऑनलाईन ठगांनी गोपाल पोपटानी यांना एका नामांकित कंपनीसोबत भागीदारी करार झाल्याचे खोटे सांगून दुप्पट नफ्याचे आमिष दाखवले. विश्वास बसल्याने पोपटानी यांनी आपली वैयक्तिक माहिती, आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती दिली. तसेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे दि. २४ जून रोजी १ लाख २५ हजार रुपये देखील गुंतविले होते.
फसवणुकीची खात्री अन् पोलिसात तक्रार
गुंतविलेल्या रकमेवर दुप्पट नफा झाल्याचे दिसत असल्याने दि. ९ जुलै रोजी गोपाल पोपटानी यांनी १० लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पैसे निघत नसल्याने त्यांनी ग्रुपमधील अनन्या कुलकर्णी व गुल टेकचन्दानी यांच्यासोबत संपर्क साधला. त्यांनी तुम्हाला आयपीओसाठी आणखी ३२ लाख ९५ हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. दरम्यान, पोपटानी यांना आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली. त्यांनी दि. ११ जुलै रोजी सायबर पोलिसात तक्रार दिली त्यानुसार सायबर ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सव्वा नऊ लाखावर १८ लाखांचा अभासी नफा
गोपाल पोपटानी यांनी दि. सव्वा लाख रुपये गुंतवणुक केल्यानंतर दि. २९ जून रोजी त्यांनी पुन्हा आयपीओमध्ये ४० हजार रुपये गुंतविले. त्यावर सुरुवातीला ८० हजारांचा नफा झाल्याचे दाखविले. विश्वास संपादन केल्यानंतर पोपाटानी यांना बँक खाते देवून त्यावर त्यांना पाहिजे तितकी रक्कम गुंतविण्यास सांगितल्यानंतर पोपटानी यांनी ९ लाख ३५ हजार रुपयांची गुंतवणुक केल्यानंतर त्यांना १८ लाख ४६ हजार ३५१ रुपयांचा अभासी नफा दिसून येत होता.















