नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात परिवर्तनाची लाट असल्याचा दावा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला. या निवडणुकीत भाजपचा पराभव होत आहे. द्वेषाच्या राजकारणाला जनता वैतागली आहे. आता स्वतःच्या मुद्द्यांवर नागरिक मतदान करीत असल्याची टीका त्यांनी केली.
देशाच्या प्रगतीसाठी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे : राहुल गांधी
देशात पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच राहुल गांधी ट्विटरवरून म्हणाले की, देशात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. पहिल्या चार टप्प्यांत जनता संविधान व लोकशाहीचे रक्षण करण्याच्या बाजूने उभी राहिली आहे. युवकांचा नोकरीसाठी, शेतकऱ्यांचा किमान हमी भावासाठी (एमएसपी) व कर्जातून मुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबन व सुरक्षा हवी आहे. मजूर वर्गाला योग्य वेतन हवे आहे. त्यामुळे अमेठी व रायबरेलीसह संपूर्ण देशातील नागरिकांनी स्वतःच्या कुटुंबासाठी, अधिकारांसाठी, देशाच्या प्रगतीसाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.
लोकशाहीसाठी विक्रमी मतदान करा : प्रियंका गांधी
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सुद्धा लोकशाहीसाठी विक्रमी मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले. लोकशाही, संविधान व विकासाचे सकारात्मक राजकारण करण्याचा संदेश त्यांनी दिला. रायबरेली व अमेठीच्या जनतेने नेहमीच आम्हाला साथ दिली. सेवा, त्याग, संघर्ष आणि बलिदानाच्या पवित्र भावनेने दोन्ही मतदारसंघातील जनता आमच्या सोबत आहे. जनता जागृत असल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. जनताच ‘जन गण मन’ची शक्ती असून तिच्यापुढे खोटारडेपणाचे सर्वात मोठे मायाजाळ कुचकामी ठरत असते. म्हणून मतदारराजाने दिशाभूल करणाऱ्या राजकारणाला आरसा दाखवावा.
हनुमान मंदिरात प्रार्थना
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी रायबरेलीतील चरुआ येथील हनुमान मंदिरात प्रार्थना केली. याप्रसंगी पुजाऱ्यांनी राहुल यांच्यासोबत सेल्फी घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघातील केंद्रांना भेट दिली. यावेळी राहुल यांनी बूथ स्तरावरील प्रक्रियेचे निरीक्षण केले. स्थानिक मतदार व बूथ योद्ध्यांशी त्यांनी हितगुज केले. राहुल गांधी यांचा व्हिडिओ काँग्रेसने ट्विटरवरून शेअर केला आहे. यंदाच्या निवडणुकीत राहुल गांधी केरळातील वायनाडसोबतच उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून नशीब आजमावत आहेत.