रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चिनावल येथील रहिवाशी तबस्सुम शेख हसन (वय २५) हिला पती शेख हसन शेख सत्तार (वय ३०) यांनी ट्रिपल तलाक दिल्यामुळे कलम ४ नुसार रावेर न्यायालयाचे न्यायमूर्ती अनंत बाजाड यांनी पतीला दोन वर्ष कारावास आणि २५ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ६ महिन्यांची शिक्षा असा आदेश दिला.
रावेर तालुक्यातील चिनावल येथील रहिवाशी तबस्सून शेख हसन या महिलेचा गावातीलच शेख हसन शेख सत्तार यांच्यासोबत सन २०११मध्ये विवाह झाला होता. दोन वर्ष संसार चालला, यादरम्यान पतीकडून तबस्सून हिला शिवीगाळ, मारहाण करणे, असे प्रकार सुरूच होते. पती शे. हसन शेख सत्तार यांनी पत्नीला तुझ्या आई-वडिलांकडून गुरांच्या व्यापारासाठी ५० हजार रुपये आणण्यास सांगितले. परंतु, पत्नीने त्यास नकार दिला. तर माझे आई- वडील गरीब आहेत, त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत, असे तिने सांगितले. तर पैसे न आणल्याने पती हा तबस्सूनला शिवीगाळ व मारहाण करत होता. तर तबस्सून ही गावातच राहत असलेल्या आई-वडीलांकडे निघून गेली होती.
दरम्यान, पतीने ६ मे २०२० रोजी बाथरूममध्ये तबस्सूनला कोंडले. त्यानंतर त्यांच्या आई-वडीलांना त्यांनी बोलावून त्यांच्यासमोरच शिवीगाळ करत तीन वेळा तलाक, तलाक, तलाक म्हणून फारकत दिली. त्यामुळे विवाहिता तबस्सून हिने व्यथित होऊन ९ मे २०२० रोजी सावदा येथील पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती. हा दावा न्यायालयात दाखल झाल्यानंतर सरकारी वकील श्रीमती एल. एन. तायडे यांनी या दाव्याचे कामकाज पाहिले. या प्रकरणात सरकारी वकीलांनी तब्बल ७ साक्षीदार तपासले. तर हा दावा दोन वर्षापासून कोर्टात सुरू होता.
रावेर येथील न्यायालयाचे न्यायमूर्ती अनंत बाजड यांच्या न्यायालयाने २३ जानेवारी २०२४ रोजी या दाव्याचा निकाल दिला. न्यायालयाने आरोपी शेख हसन शेख सत्तार यास दोन वर्ष कारावास आणि २५ हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास ६ महिन्यांची शिक्षा सुनावली. तर फिर्यादीची सासू हिला निर्दोष मुक्त केले आहे. दरम्यान, मुस्लिम महिला प्रोटेक्शन राईट ऑफ मॅरेज अॅक्ट २०१९ मधील सेक्शन ४ नुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे. फिर्यादी महिलेच्या वतीने सरकारी वकील श्रीमती एल. एल. तायडे यांनी काम पाहिले.