जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी आरटीओ खाते,बीएचआरमधील घोटाळे तसेच जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांबाबत वाचा फोडली आहे. गेल्या तीन महिन्यात तर खडसे यांनी जिल्ह्यात वेळोवेळी आंदाेलने करुन सरकारला उघडे पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे खडसे यांच्यासह परिवारातील व्यक्तींना बदनाम करण्याचा प्रयत्न राज्यातील व जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी चालवला आहे. तसेच त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचला आला आहे. या प्रयत्नांना वेळीच आळा घालावा,अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी अमन मित्तल आणि पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, खडसे हे गेल्या चाळीस वर्षांपासून राज्याच्या राजकारणात व समाजसेवेत आहेत.त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपातील काही महत्वकांक्षी नेत्यांनी विविध गुन्ह्यात विविध प्रकारच्या तपास यंत्रणांना मागे लावून त्यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करुन पाहिला. न्यायव्यवस्थेने त्यांना त्या अपयश दिल्याने ते हवालदिल झाले होते. परंतु, त्याच प्रवृत्ती परत राज्याच्या सत्तेत आल्याने त्यांनी पैशांचा व तपास यंत्रणांचा ससेमिरा लावून पुन्हा खडसे यांना राजकारणातून संपण्याचा डाव रचला आहे.खडसेंसारखा खमका विरोधक राजकारणातून संपवल्याशिवाय राज्यातील विविध निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सहकारी निवडणुकांमध्ये यश मिळवून सत्ता प्राप्त होणार नाही. असे लक्षात आल्याने व खडसे विधानपरिषद सभागृहात सत्ताधाऱ्यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाहीत.
तसेच गेल्या तीन महिन्यात खडसे यांनी जिल्ह्यात वेगवेगळी आंदोलने करुन सरकारला उघडे पाडले. जिल्ह्यात चालणारे अवैध गुटखा, सट्टा, जुगार व वाळू उपसा तसेच घोटाळ्यांना वाचा फोडली. त्यामुळे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न राज्यातील व जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी चालवला आहे.सत्ताधाऱ्यांनी एखाद्या मोठ्या तथाकथीत फौजदारी गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचण्यात आल्याचे पोलिस अधिकारी खासगी स्वरुपात माहिती देत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेतील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन खडसे यांना गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात अडवण्याचा कट रचण्यात आल्याचे कळत आहे. त्यासाठीच वेळोवेळी शासनाने पुरवलेल्या त्यांच्या विविध सुरक्षाही काढून घेण्यात आल्या आहेत. त्यांच्या जीवीताला धोका पोहोचवण्याचा कटही केलेला असू शकतो. सत्ताप्राप्तीसाठी ते कोणत्याही थराला पोहोचू शकतात. त्यांच्या प्रयत्नांना वेळीच आळा घालावा. खडसेंवर कोणत्याही प्रकारचे खोटे व बिनबुडाचे आरोप व खोटे गुन्हे दाखल केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीतर्फे निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, संजय जाधव, मजहर पठाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.