मुंबई (वृत्तसंस्था) नवीन वर्षात काँग्रेसमध्ये अनेक फेरबदल होणार आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची निवड निश्चित समजली जात आहे. पण, पटोले यांनी अध्यक्षपदासोबतच कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्षपदाच्या अधिकृत घोषणे आधीच पटोले यांनी केलेल्या मागणीमुळे काँग्रेस वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचे निश्चित झाले होते. त्यांच्या निवडीची घोषणा होणार, इतक्यात पटोले यांनी अध्यक्षपदासोबत कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली. परिणामी, नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा पक्षश्रेष्ठींनी थंड बस्त्यात टाकल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. बाळासाहेब थोरात यांच्याकडे मंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपद अन् विधिमंडळ नेतेपद अशी तिहेरी जबाबदारी आहे. परिणामी राज्य प्रभारी यांना पक्षसंघटनेसाठी पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष पाहिजे आहे. त्यात पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद त्यागून प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याची स्वत:हून मागणी केली. कुणबी, विदर्भ नेता अन् धडाकेबाज स्वभाव म्हणून पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद निश्चित झाले. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यास मंजुरीसुद्धा दिली. आश्चर्य म्हणजे पटोले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यापैकी एक मंत्रिपद मागितले आहे. पटोले यांच्या नव्या मागणीने पक्षश्रेष्ठी नाराज झाल्याचे सांगण्यात येत आहे.
बाळासाहेब थोरात यांच्याकडे मंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपद आणि विधिमंडळ नेतेपद असल्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यपद सोडण्यास तयारी दाखवली आहे. प्रदेशाध्यक्षपदावर पूर्ण वेळ कुणी तरी असावे असा मत प्रवाह निर्माण झाला होता. त्यामुळेच विदर्भातील नेता आणि धडाकेबाज स्वभाव असल्यामुळे नाना पटोले यांची निवड निश्चित झाली होती. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यासाठी मंजुरी सुद्धा दिली होती. पण, आता नाना पटोले यांच्या या नव्या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.