केज : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे सोमवारी (दि.९) दुपारी भर रस्त्यातून अपहरण झाले होते. यानंतर काही तासासच त्यांचा मृतदेह तालुक्यातील केज ते नांदूरघाट रस्त्यावरील दैठणा फाटा येथे आढळून आला. घडलेल्या या घटनेने केज तालुक्यात खळबळ उडाली होती. संतोष पंडितराव देशमुख यांच्या निर्दयी हत्येप्रकरणी सुदर्शन घुले (रा. टाकळी ता. केज) ज) व इतर पाच आरोपींवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खुन केल्याची घटना सोमवारी घडली घडलेल्या या घटनेने केज तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक पांडकर, चेतना तिडके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस निरीक्षक उस्मान शेख, प्रशांत महाजन यांना आदेशित करून आरोपींच्या शोधासाठी तात्काळ पथके रवाना केली आहेत.
सदरील आरोपींचा वाशी, धाराशिव परिसरात शोध घेत असतांना मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलिसांनी जयराम माणिक चाटे (वय २१, रा.तांबवा ता. केज) आणि महेश सखाराम केदार (वय २१ वर्ष, रा. मैंदवाडी ता.धारुर) या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून इतर आरोपींची माहिती घेण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.
गुन्ह्यात सहभागी प्रत्येकावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी अफवावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी केले आहे. ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना उद्या म्हणजेच बुधवार ११ डिसेंबर रोजी न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हत्येप्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आली असली तरी मुख्य आरोपीसह इतर आरोपींना अटक होत नसल्याने केज तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष दिसत आहे. केज शहरात आणि मस्साजोग येथे रास्ता रोको आंदोलन सुरु आहे.