जळगाव (प्रतिनिधी) महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळातून व्यवसासाठी बोगस लाभार्थ्यांच्या नावे ७०२ प्रकरणात ६७ बँकांमधून तब्बल ६.५० कोटीचा अपहार केल्याच्या २०१८ मधील गुन्ह्यातील दोन संशयिताना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
खंडु विठोबा लोहकरे (वय ४६, रा. शिवाजीनगर, नाशिकरोड), सागर वसंत अडकमोल (वय ३९, रा. महाबळ परिसर, रविराज कॉलनी), मुकेश देवराव बारमासे (वय ५०, रा. बुद्धनगर, नागपुर), जयेश रघुनाथ सोनार (वय २८, रा. गायत्रीनगर), सुनंदा बाबुराव तायडे (वय ५९, रा. वानखेडे हौसींग सोसायटी), प्रकाश लक्ष्मीकांत कुळकर्णी (वय ३८, रा. राधाकृष्णनगर) या सर्वांनी मिळुन हा अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे. यातील जयेश सोनार व सुनंदा तायडे या दोघांना बुधवारी अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयात हजर केले असता ३० नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
महात्माफुले मागासवर्गीय विकास महामंडळाअंतर्गत गरीब गरजूंना व्यवसायासाठी अर्थसाहाय्य दिले जाते. महामंडळाने पाठवलेल्या लाभार्थींच्या प्रकरणांवर कर्ज मंजूर झाल्यास संबधीताच्या वैयक्तीक स्टेट बॅंकेतील खात्यात कर्जाची रक्कम वर्ग होऊन कर्जाचे खाते सुरू केले जाते व त्यातूनच फेड करायची असते. परंतू या प्रकरणात बनावट लाभार्थीसह सर्वच कागदपत्र बनावट सादर करून साधार ६७ बँकांमधून ७०२ वेगवेळ्या प्रकरणात प्रत्येकी ९० हजार असा ६.५० कोटीच्या सबसिडीचा अपहार केल्याप्रकरणी महात्माफुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे तत्कालीन जिल्हा व्यवस्थापकानी ४ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. बोगस लाभार्थ्यांचे नावाने कर्ज मंजूर करण्यासह बँकेचे बनावट दस्तऐवज तयार करून सबसिडीची रक्कम वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या प्रकरणात काही व्यक्तीच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासाला आता आर्थिक गुन्हे शाखेकडून वेग आला असून याप्रकरणात आणखी काही आरोपी वाढणार आहेत.
वैशाली अनिल जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, यातील संशयितांनी बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संगनमत करुन काही दलालांना हातशी धरुन, गुन्हेगारी स्वरुपाचा कट व कारस्तान रचले. यामुळे शासनाच्या बीजभांडवल (मार्जीन मनी) या योजनेत जे लाभार्थी अस्तीत्वात नाहीत अशांच्या नावे बोगर कर्ज प्रकरण तयार केले. यात काहीचे फोटो, आधारकार्ड, रहिवासी पत्ता हे देखील वेगवेगळे आहेत. अशा प्रकारे बनावट दस्ताऐवज तयार केले. हे दस्ताऐवज खरे आहेत असे भासवुन खोटा हिशेब तयार केला. यामुळे शासनाचे नुकसान झाले. यात बीजभाडंवल योजनेंतर्गत बीजभाडंवल व सबीसीडीचे चेक पास केले. यात शासनाचा साडेसहा कोटी रुपयांचा अपहार केला. दरम्यान, यात यापूर्वी प्रकाश कुलकर्णी व अमीरीष मोकाशी यांना अटक करण्यात आली आहे. तर बुधवारी जयेश सोनार व सुनंदा तायडे यांना अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्याची एकच मोडस ऑपरेंडी आणि एकच टोळी !
महात्माफुले मागासवर्गीय विकास महामंडळाअंतर्गत वेगवेगळ्या प्रकरणात सबसीडी लाटणारी टोळीने बनावट लाभार्थींचे बनावट दस्तऐवज तयार केले होते. एवढेच नव्हे तर, बँकेचे देखील कागदपत्र आणि बनावट शिक्के तयार केले होते. हीच पद्धत स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आनंद नगर शाखेत करोडोचा गृह कर्ज घोटाळ्यात वापरण्यात आल्याचे समोर आले होते. तक्रारदाराने देखील आपल्या तक्रारी अर्जात तसे नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे २००८ मधील गुन्ह्याची आणि आताची मोडस ऑपरेंडी एकच दिसून येत आहे. विशेष म्हणजे टोळी देखील एकच असल्याचे बोलले जात आहे.