वर्धा (वृत्तसंस्था) सेलू तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथील एका २३ वर्षीय युवतीच्या घरी जाऊन दोन दुचाकीने आलेल्या चार जणांनी चाकूने वार करीत हत्या केली. ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. अंकिता सतीश बिलबोडे, असे मयत तरुणीचे नाव आहे.
मानेवर चाकूचे वार !
घटनेच्या दिवशी रात्री अंकिता तिची आई आणि आजी घरी टीव्ही पाहत बसल्या होत्या. वडील घराच्या मागील बाजूस बसून होते. कुणीतरी घराचे फाटक ठोठावल्याचा आवाज आल्याने अंकिता कोण आले, म्हणून बाहेर बघण्यासाठी निघाली. तेव्हा दोन दुचाकींनी आलेल्या या चौघांपैकी एकाने अंकिताच्या मानेवर चाकूचे वार केले. दुसरा सहकारी ‘मार तिला’ म्हणून ओरडत होता. त्यामुळे आई व आजी बाहेर आली. लागलीच अंकिताला जखमी अवस्थेत घरात आणले. त्यांना पाहताच या चौघांनी तेथून पळ काढला.
नागरिकांनी पाठलाग करून हल्लेखोरांना पकडून दिले !
जखमी अंकिताला शेजारच्या लोकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. इकडे गावातील काही नागरिकांनी जुनोनामार्गे पळालेल्या या चौघांचा पाठलाग करून त्यांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. अंकिताचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर धावा बोलत आपला रोष व्यक्त केला. मृतक अंकिता बोरगाव (मेघे) येथे ब्युटी पार्लरचा कोर्स करीत होती. नालवाडी येथे राहणारा लक्की अनिल जगताप हा नेहमीच अंकिताला फोनवरून त्रास देत जिवे मारण्याची धमकी देत होता.
भीतीपोटी कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती !
बैलपोळ्यानंतर तिला असाच फोन करून त्याने धमकी दिली होती. तसेच तिच्या भावालाही त्याने धमकी दिल्याने भीतीपोटी या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. लक्की हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, तो यवतमाळ येथील रहिवासी आहे. त्याच्यावर तेथे गुन्हे दाखल असल्याने तो नालवाडी येथे राहण्यास आला, अशी माहिती आहे. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे हे कुटुंब दहशतीत होते. सध्या हल्लेखोर चौघेही पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात दहेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार योगेश कमाले व त्यांचे सहकारी या घटनेचा तपास करीत आहेत.
आरोपींना चांगलाच चोप देत, त्यांच्या दोन्ही दुचाकी पेटवून दिल्या !
अंकितावर चाकूने वार करुन आरोपी ज्ञानेश्वर महेंद्र खोब्रागडे (२४, रा. इतवारा बाजार वर्धा), प्राप्ती लक्क जगताप (२३), आचल बादल शेंडे (२१ रा. गोरक्षण वॉर्ड) आणि एक अल्पवयीन या चौघांनी तेथून पळ काढला. घरच्यांनी आरडाओरड सुरु केली. चौघेही जुनोना परिसराकडे गेल्याचे समजताच गावकऱ्यांनी जुनोना गावातील नागरिकांना याची माहिती दिली. जुनोना येथील गावकऱ्यांनी आरोपींना पकडून ठेवले. पाठलाग करणाऱ्या गावकयांनी आरोपींना चांगलाच चोप देत त्यांच्या दोन्ही दुचाकी पेटवून दिल्या. दरम्यान, खुनाचे नेमकं कारण, पोलीस तपासातूनच समोर येईल. याबाबतचे वृत्त आज स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
खुनाचे नेमके कारण अस्पष्ट !
हल्लेखोरांनी गावात येत अंकिताच्या घरात शिरून तिची हत्या करण्यात आली. यात धारदार शस्त्राने निर्दयीपणे थेट तिचा गळा चिरण्यात आला. असे असले तरी अंकिताच्या खुनाचे नेमके कारण सध्या अस्पष्ट आहे. ज्या क्रूर पद्धतीने अंकिताचा खून करण्यात आला. त्यामुळे नागरिकांत खून करणाऱ्यांबाबत संतापाची लाट आहे. पोलिसांच्या तपासानंतर सगळ्या बाबी स्पष्ट होणार आहेत. याबाबतचे वृत्त आज स्थानिक माध्यमांनी दिले आहे.