अकोला (वृत्तसंस्था) शहरातून जात असलेल्या कारंजा ते मंगरुळपीर महामार्गावर शेलुवाडा नजीक अपघातानंतर भरधाव अॅपेसह धरणात बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला. ही घटना दि. २० ऑगस्टच्या मध्यरात्री दरम्यान घडली असून अलीमोदीन काजी (३८) रा. कारंजा असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, कारंजातील अलीमोद्दीन काजी व त्याचा मित्र वसिम खान हे अॅपे रिक्षाने जात असताना मार्गातील शेलुवाडा नजीक अपघात घडला. यावेळी दोघेही ॲपेसह मार्गालगतच्या धरणात बुडाले. यापैकी वसिम खान पोहत पाण्यात बाहेर आल्याने थोडक्यात बचावला. तर अलीमोद्दीन अॅपेसह पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलिसांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपातकालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली.
यानंतर सदाफळे यांनी पथकातील त्यांचे मंगरुळपीर येथील सहकारी अतुल उमाळे, गोपाल गीरे, लखन खोडे, दत्तात्रय मानेकर, प्रदिप बुंधे यांना घटनास्थळी रेस्क्यूसाठी रवाना केले. या चमूने जवळपास तीन तास बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेतला. यानंत सदर व्यक्तीचा मृतदेह अॅपेसह पाण्याबाहेर काढण्यात यश आले.