घोटी : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्र परिसरात पर्यटनासाठी आलेले मुंबईचे तीन पर्यटक बुडाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. यातील दोन पर्यटकांचे मृतदेह बचाव पथकाने शोधले असून, अजूनही तिसऱ्या पर्यटकाचा शोध सुरू आहे. मृतांमध्ये मुफदल हरहरवाला मुफदल सैफुद्दिन हरहरवाला (वय ५२, रा. सैफीक पार्क, चर्चरोड, अंधेरी) व सिद्धेश दिलीप गुरव (वय २३, रा. लालबाग, मुंबई) यांचा समावेश आहे.
सोमवारी (दि. २७) सायंकाळच्या सुमारास सिद्धेश गुरव याचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला होता. तर, मुफदल सैफुद्दिन हरहरवाला यांचा मृतदेह तब्बल ४८ तासांच्या शोध मोहिमेनंतर मंगळवारी (दि. २८) बचाव पथकाला सापडला. मात्र, तिसऱ्या पर्यटकाचा बचाव पथका कडून अजूनही शोध घेण्यात येत आहे. रविवारी (दि. २६) सकाळच्या सुमारास मुंबई येथून आलेले १४ ते १५ पर्यटक वैतरणा धरणात पोहायला उत्तरले होते. त्यापैकी तिघे जण बुडाल्याने गत दोन दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदार श्वेता संचेती, स्थानिक मंडल अधिकारी, तलाठी यांच्यासह घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक आशिष रोही, हवालदार रामकृष्ण लहामटे, पराग गोतरणे, शिवाजी शिंदे, गौरव सोनवणे, तसेच महिंद्रा कंपनीतील फावरमन हरीश चौबे, बचाव पथकाचे आकाश देशमुख, विजय घारे, अविनाश म्हसणे, आकाश भागडे आदी घटनास्थळाच्या परिसरात तळ ठोकून पाण्यात बुडालेल्यांचा पर्यटकांचा शोध घेत होते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतील पाण्याचा वेग अधिक असल्याने शोधकार्यात बचाव पथकाला अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, बुडालेल्या तिघांपैकी दोघांचे मृतदेह अथक प्रयत्नांती अखेर पथकाच्या हाती लागले आहेत.