ठाणे (वृत्तसंस्था) ठाणे महापालिकेच्या माजीवडा प्रभागाच्या सहायक आयुक्तांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने हा जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला आहे. हा भ्याड हल्ला एका अनधिकृत फेरीवाल्याने केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
ठाण्यातील कासारवडवली नाका याठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी उच्छाद मांडला असल्याने आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या महापालिका कर्मचाऱ्यांसोबत त्याठिकाणी कारवाईसाठी पोहोचल्या. ही कारवाई अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात होती. कारवाई सुरू असतानाच त्या ठिकाणी असलेला अमरजीत यादव हा अनधिकृत फेरीवाला संतापला आणि त्याने रागाच्या भरात पिंपळे यांच्यावर चाकूने हल्ला केला.
या फेरीवाल्यने त्यांच्या डोक्यावर चाकुने मारायचा प्रयत्न केला, त्याच वेळी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवल्याने त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली आणि तुटून खाली पडली. हल्ला झाल्याचे समजताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी या माथेफिरू फेरीवाल्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने स्वतःच्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. हे थरारनाट्य भर रस्त्यात काही वेळे सुरू होते. मात्र त्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने यादव याला अटक केली.