चाळीसगाव (प्रतिनिधी) दुकान बंद करून मोटारसायकलवर घरी जात असलेल्या व्यापाऱ्याचे मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीवर बॅगेत ठेवलेला २ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल युनिकॉन मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी हिसाकावून पोबारा केल्याची घटना शहरातील गवळी वाडा, राठोड हॉस्पीटल रोडवर घडली असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दोघांचोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, उद्देश विनोद कोठारी रा. चाळीसगाव हे किराणा दुकानदार दि.३१ रोजी किराणा दुकान बंद करून रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलवर घरी जात असताना शहरातील गवळी वाडा व राठोड हॉस्पीटलच्यामध्ये काळ्या रंगाची युनिकॉन एमएच १५ ९२६९ ह्या मोटारसायकलवर दोन जण आले, पाठीमागे बसलेल्या डोक्यात लाल रंगाची टोपी व अंगात मरून रंगाचा शर्ट घातलेल्या तरुणाने व्यापाऱ्याच्या गाडीच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली बॅग हिसकावून पळ काढला. व्यापाऱ्याने एस मार्टकडून अंधशाळे पर्यंत दोघांचा पाठलाग केला पण ते भडगाव रोडने पळुन गेले. या घटनेची माहिती चाळीसगाव पोलिसांना सांगितल्यावर नाईट ड्यूटीवरील पोलिसांनी भडगाव रोडवरील पातोंडापर्यंत त्यांचा शोध घेतला मात्र दोघे चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. व्यापाऱ्याचे मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीवर बॅगेत ठेवलेले २० हजार रुपये किंमतीचा आय फोन ११ व १० हजार रुपये किमतीचा वन प्लस मोबाईल फोन तसेच २ लाख ४१ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
चोरांचा पाठलाग करत असतांना गाडीवरुन घसरून पडल्याने उद्देश कोठारी यांच्या उजव्या पायाला व गुडघ्याच्या वाटीला मार लागल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरु आहे. व्यापाऱ्याचे काका संदीप पारसमल कोठारी व्यवसाय किराणा दुकान रा. शुभम पॅलेस लक्ष्मीनगर देवकर मळ्याजवळ चाळीसगाव ह.मु. रा. तिरुपती नगर रोहीणी अपार्टमेन्ट देवपुर ता. जि धुळे यांच्या फिर्यादीवरून दोघा अज्ञात आरोपी विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास योगेश माळी करीत आहेत.
















