सोलापूर (वृत्तसंस्था) भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या ताफ्यावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावर दोन युवकांनी दगडफेक केली आहे. यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली.
शरणू हांडे, सोमनाथ घोडके अशी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या दोघा तरुणांची नावं आहेत. हे दोघे स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. काल पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आपण हे पाऊल उचललं आहे. आम्ही पळून न जाता स्वतः पोलीस स्टेशनला जातोय, असं शरणू हांडे याने सांगितलं. काल पडळकर यांच्या गाडीवर राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने मोठा दगड घालून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्याला अद्याप अटक केलेली नाही. त्या निशेधार्थ आम्ही राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं, असं शरणू हांडेनं म्हटलं आहे.
कालच पडळकरांच्या गाडीवर झाली होती दगडफेक
भाजप आमदार गोपीचंद पडळकर सोलापूर दौऱ्यावेळी आले असता त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशी घोषणा देत गाडीवर भला मोठा दगड टाकून संबंधिताने तिथून पळ काढला. पडळकर समर्थकांनी मोटारसायकलवर पाठलाग केल्यानंतर सुद्धा दगडफेक करणारा हाती लागला नाही.
















