नंदूरबार (वृत्तसंस्था) त्यांना आपल्या आमदार, खासदारांना न्याय देता आला नाही. त्यामुळेच सर्व आमदार, खासदार त्यांना सोडून शिंदें सोबत जोडले गेलेले आहेत. कालपर्यंत निष्ठावंत असलेले शिवसैनिक आज शिंदे गटात सामील होत आहेत. याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच सर्वस्वी जबाबदार असल्याचा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.
राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच
गिरीश महाजन मीडियाशी संवाद साधत असताना म्हणाले की, वारंवार स्थगिती सरकार म्हणून शिंदे-भाजप सरकारचा उल्लेख केला जात आहे. मात्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत नव्हतं. तरीही त्यांनी काही निर्णय घेतले. अल्पमतातील सरकार निर्णय घेऊ शकत नाहीत. निधीही राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच अधिक मिळाला होता. मात्र, आता सर्वांना समान निधी दिला जाणार आहे. या सरकारमध्ये कुणावरही अन्याय होणार नाही, असेही महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. नव्या सरकारने अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. त्यावरही महाजन यांनी उत्तर दिलं आहे. राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. मात्र कोणाला किती मंत्रिपद द्यायचे. याचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ नेते मंडळी घेणार आहेत. लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
















