मुंबई (वृत्तसंस्था) मी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलं आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करुन दाखवावी, अशी खोचक टीका राणे यांनी केलीय. तसं ट्वीट नारायण राणे यांनी केलं आहे.
सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध भाजपचे नेते असं चित्र सातत्यानं पाहायला मिळत आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (शनिवार) कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचं ऑनलाईन उद्धाघटन झालं. यावेळी त्यांनी संवाद साधताना अप्रत्यक्षपणे भाजपा नेते नारायण राणे यांना टोला लगावल्याचे दिसून आले. त्यांच्या टीकेला नारायण राणे यांनी ट्विटपणे उत्तर दिलं आहे. “मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी.” असं नारायण राणे यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी राणेंना हा टोला लगावला. अनेकदा योजनांची घोषणा केली जाते. नारळ फोडतात आणि पुढे काम होत नाही. पण आपल्या सरकारकडून तसं होणार नाही. ज्या योजना होणाऱ्या असतात त्याचीच आपण घोषणा करतो. त्यामुळे आता या योजनांचा शुभारंभ झालाय. त्या आपण पूर्ण करणार आहोत. या योजना पूर्ण झाल्यानंतर मी स्वत: त्याचं उद्घाटन करण्यासाठी कोकणात येईल, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं. मी कोणत्याही योजनांच्या केवळ घोषणा करणार नाही. ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्याच घोषणा मी करेल. ज्या घोषणा करेल त्या पूर्णही करेल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
भाजपा खासदार नारायण राणे यांनी कोकणात खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल बांधले आहे. या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी गृहमंत्री अमित शाह आले होते. कुडाळा तालुक्यातील पडवी गावात खासगी ७० एकर जमिनीवर चार वर्षांपूर्वी नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात केली होती. मागच्या सात दशकांपासून सिंधुदुर्ग जिल्हा चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधांपासून वंचित असल्याचे नारायण राणे म्हणालेले आहेत.