जळगाव (प्रतिनिधी) महापालिकेच्या माध्यमातून पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. कामाचे या भूमिपूजन २३ एप्रिल रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. संपर्कप्रमुख संजय सावंत व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जागेची व रस्त्यांची पाहणी केली.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रथमच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पाचोरा येथे २३ रोजी त्यांची जाहीर सभा होणार आहे. याच दौऱ्याच्या नियोजनात जळगावातील शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचाही समावेश आहे. ठाकरेंच्या हस्ते पिंप्राळा चौकातील शिवस्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. विमानतळावरून थेट पिंप्राळा येथे व त्यानंतर जैन हिल्स येथे राखीव वेळ राहणार आहे. दुपारनंतर ठाकरे पाचोरा रवाना होतील, असे नियोजन आखण्यात आले आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, दीपक राजपूत, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील आदी उपस्थित होते.