मुंबई (वृत्तसंस्था) आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले. आता काटे पहा. गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे. पुन्हा नविन गुलाब फुलविन, असा आशावाद व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार माजी मंत्री गुलाबराव पाटलांवर टीका केलीय. उद्धव ठाकरे यांनी आज जळगावमधील शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
शिवसेना पक्षाच्या शपथपत्राचे आणि प्रतिज्ञापत्राचे गठ्ठे घेऊन जळगावमधील शेकडो पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर हजेरी लावली. त्याच शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी जळगावचे बंडखोर नेते गुलाबराव पाटलांचा संदर्भ देऊन आपल्याला नवे गुलाब फुलवायचे आहेत, असं म्हणत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. भाजपचा वंश नेमका कोणता? सगळे रेडीमेड आहेत. हायब्रीड आहेत. भाजपवाले वंश विकत घेतायत. सध्या ज्यांना मी मोठं केलं, ते आपल्या सोबत नाहीयेत. पण त्यांना मोठे करणारे तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. तुमच्याच ताकदीवर आपण त्यांना धडा शिकवू. पण आज नि:क्षून सांगतो, आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले. आता काटे पहा. गुलाबाचं झाड माझ्याकडे आहे. पुन्हा नविन गुलाब फुलविन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तुमची साथ अशीच माझ्या पाठिशी राहू द्यात. पक्षसंघटनेचं काम मोठ्या जोमात करा. आपल्याला शिवसेना पक्ष सदस्य नोंदणीचं काम मोठ्या प्रमाणात करायचं आहे. आता तुम्ही शपथपत्रांचे गठ्ठे आणले आहेत, तसेच गठ्ठेच्या गठ्ठे मला हवे आहेत. गेली महिनाभर मातोश्रीवर गर्दी उसळती आहे. आपली लढाई दोन-तीन पातळीवर सुरू आहे. रस्त्यावरच्या लढाईत आपण मागे पडणार नाहीत. न्यायालयीन लढाईतही आपण मागे नाही आहोत. दिग्गज वकील आपल्यासाठी लढतायेत. कायद्याची लढाई सुरू आहे, न्याय देवतेवर माझा विश्वास आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.