सातारा (वृत्तसंस्था) साताऱ्या (Satara) जिल्ह्यातल्या वाईमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अभ्यास घेण्याच्या बहाण्याने मामानेच आपल्या अल्पवयीन भाचीवर बलात्कार (Satara Rape Case) केल्याची घटना घडली आहे. मुलगी गर्भवती (Girl Got Pregnant) राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी मामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाईच्या डीवायएसपी डॉ. शीतल जान्हवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.आय. बाळासाहेब भरणे यांच्या नेतृत्त्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे आणि महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे यांनी ही कारवाई केली आहे. मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संताप व्यक्त होतो आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाई तालुक्यातल्या एका गावात ही अल्पवयीन मुलगी तिच्या आजी आजोबांसोबत राहात होती. तिचे आई-वडील मुंबईमध्ये राहात होते. ही घटना ऑक्टोबर महिन्यात घडली आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने सगळा प्रकार समोर आला. पीडित मुलीचा अभ्यास घेण्याच्या बहाण्याने मामाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर हीच घटना पुढे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातही घडली. त्याने तिला कुणाला काहीही सांगू नकोस अशी धमकीही दिली होती.
यानंतर या मुलीला त्रास होऊ लागला. पीडित अल्पवयीन तरूणीला रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं असता ती गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी मामाला गावातून ताब्यात घेतलं आहे. सदर प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकारी उपनिरीक्षक स्नेहल सोमदे करत आहेत