जळगाव (प्रतिनिधी) शेअर चॅटवरील व्हिडिओ पाहण्याचे टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली एका महिलेची १२ लाख ७२ हजार ४२३ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोकरदार असलेल्या एका महिलेला १६ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान वेळोवेळी राजा ठाकूर व पट्टेश रिमाह, कुशल, ज्योती, चंदेर असे नाव सांगणाऱ्यांनी टेलिग्राम या सोशल मीडियावर संपर्क साधला. त्यात त्यांना शेअर चॅटवरील व्हिडिओ पाहण्याचे टास्क दिले. त्यादरम्यान तक्रारदार महिलेकडून वेळोवेळी १३ लाख ४० हजार ५५० रुपये ऑनलाईन स्वीकारले. त्यापैकी ६८ हजार १२७ रुपये महिलेला परत दिले. त्यानंतर मात्र उर्वरित उर्वरित रक्कम परत न देता १२ लाख ७२ हजार ४२३ रुपयांमध्ये फसवणूक केली. रक्कम परत मिळत नसल्याने महिलेने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील ह्या करत आहेत.