जळगाव/पाचोरा (प्रतिनिधी) जळगावहून मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यात आग लागली असल्याच्या अफवेमुळे १२ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास पाचोराजवळील माहिजी ते परधाडे रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या या भयंकर अपघातात छिन्नविच्छिन्न मृतदेहांचे अवशेष लांब अंतरापर्यंत विखुरले होते.
अपघातस्थळी मिळालेल्या माहितीप्रमाणे, मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्सप्रेसच्या पेंट्रीकारमध्ये आग लागली असल्याची अफवा पसरली. यामुळे एक प्रवासी चेन ओढताच गाडी अचानक थांबली आणि घर्षणामुळे रुळांवर आगीच्या ठिणग्या उडाल्या, तसेच धुराचा लोट उडाला. या कारणामुळे गाडीला आग लागली असावी, अशी भीती सर्व प्रवाशांना वाटली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी गाडीच्या डब्यांतून बाहेर उडी मारली. ज्या ठिकाणी गाडी थांबली, त्या ठिकाणी नदीवरील पूल होता आणि या प्रवाशांनी उडी मारल्याच वेळी बाजूच्या ट्रॅकवरून कर्नाटक एक्सप्रेस वेगाने येत होती. पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवासी रुळांवर पडले, ज्यामुळे कर्नाटक एक्सप्रेसच्या धडकेने त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, २० ते २५ प्रवाशी जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींपैकी अनेक प्रवासी इतर राज्यांतील होते, आणि त्यांची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
चेन पुलिंगच्या तपासणीसाठी थांबली होती पुष्पक एक्स्प्रेस
पुष्पक एक्स्प्रेस थांबल्यानंतर चेन पुलिंगबाबत तपासणी सुरू होती. . मात्र, यावेळी काही प्रवासी गाडीतून उतरू लागले. तपासणी होत असताना चालकाने नियमानुसार फ्लॅशर लाइट ऑन केला होता. दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरने तो लाइट पाहिलादेखील. त्यानंतर कर्नाटक एक्स्प्रेस गाडीला ब्रेक लावून गाडी वेळेत थांबवण्याचा प्रयत्नदेखील मोटरमनने केला. मात्र, या घटनास्थळावर दोन डिग्रीच्या वळणामुळे दृश्यता आणि ब्रेकिंगसाठीचे अंतर कमी होते. दोन्ही चालकांनी ही घटना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु दुर्दैवाने अपघात घडल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली.
धक्कादायक, वेदनादायी दुर्घटना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भीषण रेल्वे अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदत देण्यात येणार असून, जखमींचे सर्व उपचार सरकारकडून करण्यात येतील. जखमींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्व सुविधा पुरवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.