लोणावळा (वृत्तसंस्था) लोणावळा शहरात रविवारी जोरदार पावसाने भुशी धरण ओव्हरफ्लो होत असतानाच धरणाच्या वरील भागात पाण्यात एका कुटुंबातील ५ जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पाण्यात बुडालेल्यांमध्ये ४ ते १३ वर्षे वयोगटातील तीन मुली व एक मुलगा तसेच एका महिलेचा समावेश आहे. यातील महिला आणि एका १३ वर्षीय मुलीच्या मृतदेहासह अन्य एकाचा मृतदेह बचाव पथकाला मिळाला असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. नूरशाहिस्ता अन्सारी (४०), अमीन अन्सारी (१३), मारिया अन्सारी (६), हुमेदा अन्सारी (६) आणि अदनान अन्सारी (६) अशी बुडालेल्या एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावे आहेत.
भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल येथून हे पुण्याच्या हडपसरमधून आलेले अन्सारी कुटुंब वाहून गेले आहे. ही घटना समजताच स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व बुडालेल्या व्यक्तींची तातडीने शोधमोहीम सुरू केली. त्यामध्ये ३ जणांचे मृतदेह सापडले असून दोघे बेपत्ता असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. पुण्यातील हडपसर येथील सय्यदनगरमधील अन्सारी कुटुंबातील काही जण रविवारी भुशी धरणावर पावसाळी पर्यटनासाठी गेले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास ते या धबधब्याच्या प्रवाहात उतरले. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील एकूण सात जण पाण्याच्या प्रवाहासोबत धरणाच्या मुख्य डोहात वाहून गेले.