जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आसोदारोड परिसरात राहणाऱ्या ३६ वर्षीय महिला ह्या शेतात जाण्यासाठी रेल्वेरूळ ओलांडताना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार १६ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता घडली आहे. याबाबत शनीपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अलका विजय कोळी वय -३६, रा. श्रीराम चौक, असोदा रोड जळगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
जळगाव शहरातील आसोदा रोडवरील श्रीराम चौकात अलका कोळी या महिला आपल्या पती आणि दोन मुलांसह वास्तव्याला आहे. त्यांचे पती विजय कोळी हे महावितरणमध्ये वायरमन आहेत तर अलका कोळी ह्या महिला शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी १६ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता शेतात जाण्यासाठी इतर महिला मजुरांसोबत शेतात जाण्यासाठी निघाल्या. दरम्यान आसोदा रेल्वे गेट जवळ रेल्वेरूळ ओलांडतांना अचानक धावत्या रेल्वेच्या त्यांना धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सुदैवाने इतर महिला या घटनेत थोडक्यात बचावल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शानिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. या घटनेबाबत पोलिसात नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पती विजय कोळी, मुलगी जागृती आणि मुलगा कार्तिक असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.