जालना (वृत्तसंस्था) रस्ता रोको आंदोलनामुळे मार्ग बदलला. यानंतर जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात कार पडून व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही दुर्दैवी घटना खापरदेव हिवरा ते एकलहरा रस्त्यावरील अचानक नगरजवळील पुलाजवळ सोमवारी सकाळी घडली. नंदू सोनाजी राजगुरू (वय ३८) असं या व्यापाऱ्याचे नाव असून ते अंबड तालुक्यातील रुई या त्यांच्या गावाहून दुपारी भार्डी मार्गे तीर्थपुरीकडे जात होते.
नंदू राजगुरू (रा. रुई) यांचे तीर्थपुरी येथील मार्केट कमिटीच्या आवारात भुसार धान्य खरेदीचे दुकान आहे. ते सोमवारी सकाळी रुई येथून मित्राच्या शिफ्ट डिझायर कार (क्रमांक एमएच.१२.केएन.२२१७) ने तीर्थपुरीकडे निघाले होते. परंतू तीर्थपुरी येथे रस्ता रोको आंदोलन सुरू असल्यामुळे नंदू राजगुरू हे खापरदेव हिवरा ते एकलहरा रोडने तीर्थपुरीला जात होते. तीर्थपुरी येथील अचानक नगरवरील पुलाजवळ आल्यानंतर तोल जाऊन कार डाव्या कालव्यात पडली. कार पाण्यात बुडाल्याने नंदू राजगुरू यांचा मृत्यू झाला. कार कालव्यात कोसळताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नाने गाडी बाहेर काढली. मात्र तोपर्यंत राजगुरू यांची प्राणज्योत मालवली होती.