अहमदनगर (वृत्तसंस्था) राज्याच्या काही भागांत पाऊस आणि गारपिटीची मालिका सुरूच आहे. परभणी आणि अहमदनगरमध्ये बुधवारी वीज पडून सहा जणांचा बळी गेला. तर जनावरेही दगावले आहेत. दुसरीकडे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाला अवकाळी पावसाने सायंकाळी जोरदार झोडपून काढले. यामध्ये नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यात वीज पडून चौघांचा मृत्यू झाला. हे सर्व जण शेतात काम करीत होते. भेर्डापूर (ता. श्रीरामपूर) येथे सायंकाळी शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात प्रमोद भाऊसाहेब दांगट (वय ४७), अलका रामदास राऊत (वय ५०), संगीता रवींद्र साळे (वय ४२) हे जखमी झाल्याने त्यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच प्रमोद दांगट व अलका राऊत यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, बालाजी देडगाव (ता. नेवासे) येथे शेतात कांदा काढण्याचे काम करणाऱ्या ४२ वर्षीय शेतमजूर महिलेच्या अंगावर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सविता राजू बर्फे असे या महिलेचे नाव आहे. तर अंमळनेर येथेही शेतात काम करणाऱ्या रावसाहेब भागाजी बोरूडे या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
परभणी जिल्ह्यातही वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. जिंतूर व पूर्णा तालुक्यातील पांगरी, सारंगी शिवारात ही दुर्घटना घडली. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतात ठेवलेले कांदे झाकत असताना विठ्ठल कोकरे या (वय ३२) युवकाचा मृत्यू झाला आहे. तर जिंतूर तालुक्यातील पांगरी शिवारात अचानक वीज कोसळल्याने मेंढपाळ युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले तर २० च्या वर शेळ्या ठार झाल्याची घटना घडली आहे.