मुंबई (वृत्तसंस्था) ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मात्र, या कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला आणि सात ते आठ श्रीसेवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
भर उन्हात हा कार्यक्रम घेण्यात आला होता, त्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. जवळपास 500 हून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उष्माघाताने 7 ते 8 जणांचा दुर्देवाने मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जात जखमींची विचारपूस केली. त्यानंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले की, आजच्या सोहळ्याला जे श्रीसेवक आले होते. त्यातील काहींना उष्माघाताचा त्रास झालेला आहे. ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची भेट घेऊन मी विचारपूस केली. चांगल्यात चांगले उपचार देण्याची सूचना डॉक्टरांना केली आहे. यात ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. परंतू ताज्या वृत्तानुसार आजच्या घटनेत तब्बल ११ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दिले आहे.
कार्यक्रमादरम्यान जवळपास सव्वाशेच्या आसपास लोकांनी डिहायड्रेशनची तक्रार केली. त्यांना तातडीने घटनास्थळी असलेल्या 30 मेडिकल बूथमध्ये नेण्यात आले. 13 रुग्णांना विशेष उपचारांची आवश्यकता होती, त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मैदान खचाखच भरले होते. श्री सदस्य (धर्माधिकारी यांची संस्था) यांच्या अनुयायांना कोणतीही सोय करण्यात आली नव्हती. त्यामुळे ते भर उन्हात कार्यक्रम पाहत होते. त्यांना शेडची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नव्हती.
दरम्यान, सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम भर दुपारी एप्रिल महिन्यात ठेवला. या निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांचा जीव गेला. अनेकजण गंभीर आहेत. सरकारने केलेला हा मनुष्यवध आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.