गडचिरोली (वृत्तसंस्था) शेतातील कृषीपंप विद्युत जोडणीला कार्बन चढलेला असल्याचे गृहीत धरून पंप सुरू होत नाही, म्हणून बांबूने हलवून सुरू करण्याच्या प्रयत्न करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावरती विद्युत जोडणी तार तुटून पडल्याने शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना कोरची तालुक्यातील बेतकाठी येथे ४ ऑगस्ट रोजी घडली. रामाधीन आनंदराव पोटावी (वय ६५) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
शुक्रवार ४ ऑगस्ट रोजी शेतकरी रामाधीन पोटावी हे शेतातील कृषिपंप सुरू करण्यासाठी सकाळच्या सुमारास शेतात गेले होते. मात्र, वीजपुरवठा सुरू न झाल्याने बांबूच्या साहाय्याने सव्हींस वायरला हलवू लागले. मात्र, तरीही वीजपुरवठा सुरू झाला नाही. थ्री फेस कनेक्शन असलेल्या कृषिपंपाच्या विद्युत जोडणीपासून एक तार तुटलेला होता. तो रामाजीच्या अंगावर पडला व रामाधीनला विद्युत शॉक लागून त्यांच्या जागीच मृत्यू झाला.
दिवसभर वडील घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता, रामाधीन शेतात मृत अवस्थेत पडून होता. त्यामुळे कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. घटनेची माहिती पोलीस पाटील गणेश गुरनुले यांनी पोलिसांना दिली. रात्री ८ वाजेपर्यंत मृतदेह शेतातून घरी आणण्यात आले. शनिवारी सकाळी मृतदेह कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन आल्यानंतर डॉ. आशीष इटनकर यांनी शवविच्छेदन केले.
अधिक तपास सहपोलीस निरीक्षक गणेश फुलकवर यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर राऊत व मडावी करीत आहेत. मृतक रामाधीन पोटावी हे आदिवासी विविध कार्यकारी संस्था बेचकाटीचे माजी उपसभापती होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली व एक अविवाहित मुलगी असा परिवार आहे.