यवतमाळ (वृत्तसंस्था) पुसद तालुक्यातील मनसळ येथील पाझर तलावात दोन चिमुकले पोहण्यासाठी गेले होते. यावेळी बुडणाऱ्या भाच्याला वाचण्यासाठी गेलेल्या मामाचाही बुडून मृत्यू झाला. करण सुखदेव एरके (७) आणि रोहिदास टाळीकुटे (२५) अशी मृतांची नावे आहेत.
मनसळ येथील पाझर तलावात पोहण्यासाठी सात वर्षांचा करण व सहा वर्षाचा अर्जून संध्याकाळी गेले होते. अर्जुनला पोहता न आल्याने तो तळ्याच्या काठीच उभा होता. तर करण पाण्यात उतरला. बराच वेळ होऊनही करण परत न आल्यामुळे अर्जुनने आई व मामाकडे धाव घेतली. त्यानंतर धावपळ करत मामा रोहिदास तळ्याजवळ आला. परंतू करण कुठेही दिसून आला नाही. त्यामुळे मामाने पाण्यात उडी मारून भाच्या करणला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याचा शोध घेत असताना मामा रोहिदासही खोल पाण्यात अडकले आणि यात त्यांचाही मृत्यू झाला.
थोड्याच वेळात नातेवाईकांनीही घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने करणचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. चिमुकल्याचा मृतदेह पाहून त्याच्या आईने व नातेवाइकांनी एकच टाहो फोडला होता. दुसरीकडे रोहिदासही कुठेच दिसून न आल्यामुळे तलावात पुन्हा शोध कार्य सुरु केले. त्यानंतर रात्री ९ ते ९.३० वाजताच्या दरम्यान रोहिदासचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. एकाच वेळी मामा भाच्याचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.