नंदुरबार (प्रतिनिधी) झोका खेळत असताना मानेभोवती दोरी अडकून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची शहादा शहरातील मंगलमूर्तीनगरात घडली. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहाद्यातील मुनेश लखमीचंद अग्रवाल यांचा नातू व ईशान यांचा चिरंजीव यश अग्रवाल हा घरात दोरीच्या झुल्यावर खेळत होता. अचानक त्यावरून खाली पडल्याने झुल्याचा दोरीचा फास त्याच्या मानेभोवती आवळल्याने तो जमिनीवर बेशुद्ध पडला होता. या घटनेकडे अचानक घरकाम करणाऱ्या बाईचे लक्ष गेले. त्यावेळी यश खाली पडलेला दिसला. तिने घरातील लोकांना याची कल्पना दिली. लागलीच घरची सर्व मंडळी धावून गेल्यानंतर त्याच्या मानेवर झोक्याचा दोरीचा गळफास लागलेला दिसला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या पथकाने घटनास्थळी भेट सदर घटनेची पाहणी केली. शहादा पोलिसात राजेंद्र अग्रवाल यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
















