गाजीपूर (वृत्तसंस्था) देशात अनेक भाषा, संस्कृती, वेशभूषा व चालीरिती असतानाही भारताने हजारो वर्षापासून एक राष्ट्र म्हणून काम केले आहे. जेव्हा जेव्हा आपले शेजारी चीन व पाकिस्तानने हल्ले केले, तेव्हा तेव्हा भारतात अभूतपूर्व एकजूट पाहायला मिळाली. म्हणूनच आजही भारतात विविधतेत एकता दिसून येते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सोमवारी केले.
गाजीपूरस्थित धामापूर गावात आयोजित कार्यक्रमात मरणोपरांत ‘परमवीर चक्र’ने सन्मानित केलेले वीर अब्दुल हामीद यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की, भारत हजारो वर्षापासून एक राष्ट्र म्हणून वाटचाल करीत आहे. आपल्या देशात अनेक भाषा आहेत. देशाचा भूभाग व्यापक आहे. इथे अनेक प्राचीन परंपरा आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असल्यामुळे तो पूजा, परंपरा व विविध संप्रदायाला मानतो. खान-पान, चालीरिती इथे भौगोलिक परिस्थितीनुसार बदलत असतात. एवढी विविधता असतानाही देश एक राष्ट्र म्हणून वाटचाल करीत आहे. भारत एक राष्ट्र तथा एक समाज आहे, असे मोहन भागवत यांनी नमूद केले. जेव्हा चीन व पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा भारतीयांनी मतभेद विसरून एकता दाखवली. हाच आपला मूळ स्वभाव आहे. म्हणूनच आम्ही सर्वजण देशावर केवळ प्रेमच करीत नसून त्याची उपासनासुद्धा करतो.
देशाने आम्हाला काय दिले? याचा आम्ही कधीच विचार करीत नाही, असे भागवत पुढे बोलताना म्हणाले. अब्दुल हामीद यांचे व्यक्तिमत्त्व आदर्श होते. त्यांनी देशासाठी बलिदान दिले. म्हणून भारतीयांनी त्यांचे आदर्श तत्त्व अंगिकारले पाहिजे. आपण सर्वांनी शहिदांचे स्मरण व अनुकरण करून जीवनात बदल घडवावा, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले.