चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील उंबरखेड येथील २३ वर्षीय उच्च शिक्षित विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून वेळोवेळी तिला अनैसर्गिक कृत्य करण्यासह बेकायदा गर्भपात करण्यास भाग पाडले व माहेरवरून पैसे आणले नाही, म्हणून छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय उच्च शिक्षित तरुणीचा विवाह ३० मार्च २०२१ रोजी तालुक्यातील उंबरखेड येथे विकास सुरेश केदार याच्याशी झाला. विकास हा राज्य कर निरीक्षक (एसटीआय) म्हणून नोकरीला आहे. असे सांगण्यात आले होते. लग्नात सुमारे सात लाख रूपये खर्च करण्यात आले. ही तरुणी सासरी गेल्यानंतर पती त्याच्या मोबाईलवरून अश्लिल व्हिडीओ दाखवून तिची इच्छा नसताना तिला अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडत असे. पतीकडून वारंवार होणाऱ्या या वर्तनाने विवाहितेला धक्काच बसला. त्यानंतरही तिला शिवीगाळ करून नाशिक येथे बदली करण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणण्यास सांगितले. तसेच तिची इच्छा नसतानादेखील तिला गर्भपात करण्यास भाग पाडले व घरातून हाकलून दिले. विशेष म्हणजे पती एसटीआय पदावर नसून लिपीक आहे. मात्र ही बाब पतीने लपवून या तरुणीचा विश्वासघात केला. सासरच्या छळाला कंटाळून या उच्च शिक्षित विवाहितेने मेहुणबारे पोलिसात धाव घेतली.
विवाहितेच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस स्थानकात पतीसह सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुभाष पाटील हे तपास करीत आहेत.















