जेजुरी (वृत्तसंस्था) जेजुरी इथे राजमाता अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. होळकर घराण्याचे वशंज यशवंतराव होळकर, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार सुप्रिया सुळे आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला विरोध केल्याने वातावरण तापलं होतं. या पार्श्वभूमीवर धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जाणारे महादेव जानकर यावेळी काय भूमिका घेतात, याकडे राज्याचं लक्ष लागलेलं असताना जानकर यांनी शरद पवारांवर जोरदार स्तुतीसुमने उधळली आहेत. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी काल पुतळ्याचं अनौपचारिक उद्घाटन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर राजकारण तापले होते, त्यामुळे जेजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.