धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावला लागून मोठा ग्रामीण भाग आहे. या भागात खूप मोठ्या प्रमाणात रुग्णाची संख्या असून सध्या रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारासाठी जळगावला जावे लागते. यामुळे अनेक रुग्णांना पोहचण्याआधीच जीव गमवावा लागतो. त्यामुळे धरणगावात तात्काळ उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे, अशी मागणी भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड : संजय महाजन यांनी केली आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे याबाबत मागणी करणार असल्याचेही अॅड : महाजन यांनी सांगितले.
धरणगावातील प्रसिद्ध उद्योजक तथा माजी नगरसेवक राजेंद्र महाजन यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जळगावला नेत असतांना त्यांचे निधन झाले. राजूभाऊ यांच्या निधनामुळे आपण एका जिवलग मित्राला गमावले. अशी वेळ इतरांवर येऊ नये, याकरिता धरणगावात उपजिल्हा रुग्णालय तात्काळ मंजूर करावे, असे अॅड : संजय महाजन यांनी म्हटले आहे. धरणगाव ग्रामीण रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील रुग्ण येत असतात. छोट्या-छोट्या आजारांसाठी त्यांना जळगावला जावे लागते. त्यामुळे धरणगावात उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्यास मोठ्या प्रमाणात रुग्णांची होणारी गैरसोय टळणार आहे. जनजीवनाच्या अन्न ,पाणी व वस्त्र या मूलभूत गरजा बरोबर आता वैद्यकीय सेवा ही आजच्या काळात मूलभूत गरजेचा एक भाग बनली आहे. त्यामुळे धरणगाव सारख्या शहरात मोठ्या प्रमाणात रुग्णाची संख्या आहे.
या ठिकाणी 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय दिल्यास फिजिशियन, बालरोग तज्ञ ,सर्जन , स्त्री रोग तज्ञ ,भूल तज्ञ , दंतशल्य, चिकित्सक, अस्थिव्यंग तज्ञ , नेत्र तज्ञ , त्वचा रोग तज्ञ , पथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट ,कान नाक घसा तज्ञ , चेस्टस्पेशालिस्ट, मानसोपचार तज्ञ, या सेवा उपलब्ध होऊ शकतील. यामुळे अनेक गोरगरीब लोकांचे प्राण वाचतील. यामुळे याबाबत लवकरच राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे याबाबतची मागणी करणार असल्याचे अॅड : संजय महाजन यांनी म्हटले आहे.