नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सध्या सर्वांत जास्त वापरला जाणारा नेट ब्राउजर म्हणजे गूगल क्रोम. दरम्यान, या ब्राउझरमध्ये तांत्रिकदृष्ट्या काही धोके निर्माण झाले आहेत. त्यामुळे सायबर हल्लेखोरांकडून या ब्राउझरमार्फत कोणाच्याही कम्प्युटरवर हल्ला होण्याचा धोका आहे, असा इशारा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने दिला आहे. क्रोमचे लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल करावी आणि तीच वापरावी, असा सल्लाही दिलाय.
पर्सनल डेटा सायबर हल्लेखोराच्या हाती लागू शकतो
गुगल क्रोम ब्राउझरचा वापर करत असलेल्या व्यक्तीच्या कम्प्युटरवरचा पर्सनल डेटा सायबर हल्लेखोराच्या हाती लागू शकतो, तसंच त्या हल्लेखोराकडून संबंधित कम्प्युटरमध्ये मालवेअरही पसरवलं जाऊ शकतं. या संभाव्य धोक्यांची दखल गुगलने आधीच घेतली असून, ते तांत्रिक धोके नसलेली क्रोम ब्राउझरची अपडेटेड व्हर्जन सादर केली आहे. त्यामुळे गुगल क्रोम युझर्सनी क्रोमची ही लेटेस्ट व्हर्जन लवकरात लवकर इन्स्टॉल करावी आणि तीच वापरावी, असा सल्ला सरकारकडून देण्यात आला आहे.
‘या’ अॅड्रेसवर क्रोम स्टेबल चॅनेल अपडेट
विंडोज, मॅक आणि लिनक्ससाठी 96.0.4664.93 या अॅड्रेसवर क्रोम स्टेबल चॅनेल अपडेट करण्यात आलं असल्याचं गुगलने अलीकडेच जाहीर केलं होतं. हा अपडेट युझर्ससाठी आधीच उपलब्ध आहे. 96.0.4664.93 येथे विंडोज आणि मॅकसाठी एक्स्टेंडेड स्टेबल चॅनेलही अपडेट करण्यात आलं असून, येत्या काही दिवसांत/आठवड्यांत ते युझर्ससाठी उपलब्ध होईल, असंही गुगलने स्पष्ट केलं आहे. कंपनीबाहेरच्या संशोधकांनी नजरेस आणून दिलेले सुरक्षाविषयक २२ तांत्रिक धोके लक्षात घेऊन, त्यावर योग्य ती उपाययोजना करून क्रोमची लेटेस्ट व्हर्जन सादर करण्यात आली आहे, असंही गुगलने कबूल केलं आहे.
इंटरनेट ब्राउझरमध्ये सुरक्षाविषयक २२ तांत्रिक धोके आढळले
CERT-In ने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असं लिहिलं आहे, की ‘गुगल क्रोम या इंटरनेट ब्राउझरमध्ये सुरक्षाविषयक २२ तांत्रिक धोके आढळले आहेत. त्यामुळे सायबर हल्लेखोर एखाद्याला लक्ष्य करून स्पेशली क्राफ्टेड वेबपेजला त्याच्या कम्प्युटरच्या क्रोमद्वारे भेट देऊ शकतो. तसं झालं, तर त्या हल्लेखोराला संबंधित व्यक्तीच्या कम्प्युटरवर आर्बिट्ररी कोड टाकणं शक्य होईल. त्यामुळे त्या युझरची पर्सनल माहिती त्याच्या हाती लागू शकते. त्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.’ या बाबी लक्षात घेऊन गुगल क्रोम युझर्सनी लेटेस्ट व्हर्जन वापरावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.