देहराडून (वृत्तसंस्था) उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अवघ्या तीन महिन्यांसाठी मुख्यमंत्री असलेले रावत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी शुक्रवारी रात्री राज्यपाल बेबी रानी मोर्या यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी पक्षनेतृत्वाने रावत यांना राजीनामा देण्यास सांगितले. रावत यांनी चार महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रावत यांचा राजीनामा महत्त्वाचा मानला जात आहे.
मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर दुपारी तीन वाजता देहरादूनमध्ये भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलविण्यात आली आहे. ही बैठक पार्टीच्या मुख्यालयात होणार आहे. उत्तराखंडचे भाजपा अध्यक्ष मदन कौशिक हे या बैठकीचे नेतृत्व करणार असल्याचे भाजपाचे मीडिया प्रभारी मनवीरसिंग चौहान यांनी सांगितले. सर्व आमदारांना बैठकीस उपस्थित राहण्यास सांगितले आहे. देहरादूनमध्ये राज्यातील सर्व भाजपा आमदारांनी उपस्थित रहावे, असे भाजपाने निर्देश दिले आहेत. तसेच, केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी निरीक्षक बनविण्यात आले आहे.
वादग्रस्त व्यक्तव्यं
मुलांवर होणाऱ्या संस्काराला आईवडीलच जबाबदार असतात. मग प्रवासात मुलाला घेऊन फिरणारी महिला जर फाटकी जीन्स घालून प्रवास करीत असेल तर ती मुलांवर कसले संस्कार करणार? असे वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्री तीरथ सिंह यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून चौफेर टीका झाली होती. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महिलांनी ट्विटरवर #RippedJeans हा ट्रेंड चालवला होता.
तीरथसिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भरपूर स्तुती करताना त्यांची तुलना थेट भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम यांच्याशी केली होती. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रतिमा उंचावली आहे, आज अनेक मोठ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष मोदी यांना भेटण्यासाठी रांगेत उभे असतात असे वक्तव्य रावत यांनी केले होते. त्रेता आणि द्वापर युगामध्ये जसा भगवान राम आणि भगवान कृष्ण यांनी अवतार घेतला होता, त्याच प्रकारे येणाऱ्या कालावधीमध्ये पंतप्रधान मोदी यांना लोकं लक्षात ठेवतील असे रावत यांनी आपल्या भाषणात म्हटले होते.