वरणगाव (प्रतिनिधी) भरधाव लक्झरीने सायकलस्वारास चिरडून तब्बल शंभर फुटांपर्यंत फरफटत नेल्याची घटना रात्री साडेसात ते आठदरम्यान फॅक्टरी फाट्यानजीक घडली. दुर्घटनेत सायकस्वार शेतकऱ्याचा मृतदेह पूर्णपणे छिन्नविच्छिन्न झाला. अपघातानंतर चालकाने लक्झरीसह पळ काढला.
अपघातात तळवेल शिवारामधील सुशीलनगरच्या भीमनगरातील रहिवासी सुकलाल शेनपड्डू वाघ (वय ६०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते शेतातून सायकलीने घरी परतत असताना फॅक्टरी फाट्याजवळ जय ट्रॅव्हल्सची बऱ्हाणपूर ते पुणे ही गाडी मुक्ताईनगरकडून भरधाव वेगाने जात असताना तिने सायकलस्वाराला चिरडले व फरफटत नेले. घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिस स्टेशनचे एपीआय आशिष अडसूळ पीएसआय परशुराम दळवी व पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
अपघातानंतर लक्झरी नशिराबादपर्यंत पळवून नेण्यात आली होती. ही गाडी वाहक शुभम श्रीराम पाटील (रा. दापोरा, ता. शहापूर) हे चालवत होते. गाडी भुसावळ येथील प्रवीण पाटील यांच्या मालकीची आहे. याबाबत दिनेश मदन बोहरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुली, नात, नातू असा परिवार आहे.