जळगाव (प्रतिनिधी) मागील 7 वर्षांपासून ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित जेष्ठ नागरिक संघाची धुरा आम्ही यशस्वीपणे सांभाळीत आहोत. आता नवीन जेष्ठ नागरिकांना संधी उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही आमचा पदाचा स्वखुशीने राजीनामा देत आहोत, असे भावनिक संभाषण वासुदेव जेष्ट नागरीक संघाचे मावळते अध्यक्ष धनराज पाटील यांनी केले.
आज रिंग रोड जवळील योग केंद्रात वासुदेव जेष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष धनराज पाटील, सचिव प्रभाकर झांबरे, उपाध्यक्ष विश्वनाथ वाणी उपस्थित होते. सुरवातीला दिवंगत सभासदांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी 2016 ते आजतागायत संघाची वाटचाल, विविध उपक्रम, आरोग्य मेळावे, चर्चा सत्र, सहल, स्नेहसंमेलन, स्नेह भोजन, सत्कार समारंभ आदी राबविले. उपक्रमाबद्दल सिंहावलोकन झाले. आज पदभार सोडतांना पदाधिकारी आणि सर्व सभासद भावनिक झाले. काहींनी आपल्या सोनेरी आठवण जागवत आसवांना वाट मोकळी करून दिली. यावेळी सर्वानुमते नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच आगामी संघाची वाटचाल यावर विचारमंथन झाले. यावेळी प्रकाश पाटील, सतीश जंगले, गणेश सरोदे, मनोज नेमाडे, मोतीराम चौधरी, भानुदास पाटील, अशोक ढाके, यशवंत वारके, संजीव चौधरी, खुशाल महाजन, वैशाली पाटील, इंदूबाई सपकाळे, लता जंगले, गोटू फिरके, पंडित पाटील, रवींद्र नारखेडे, सोपान नेमाडे, अनिल पाटील आदी जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणी जाहीर
अध्यक्ष, प्रकाश पाटील, सचिव सतीश जंगले, सहसविव संजय चौधरी, उपाध्यक्ष भानुदास पाटील, कोषाध्यक्ष जीवराम शिवतुरे यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच मागील कार्यकारिणीला मार्गदर्शक टीम म्हणून जाहीर करण्यात आले. यावेळी संयोजक नेत्रतज्ञ डॉ. नितु पाटील यांनी आगामी काळात वासुदेव जेष्ठ नागरिक संघाच्या विविध उपक्रम विषयी विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर झांबरे आणि आभार प्रदर्शन विश्वनाथ वाणी यांनी मांडले. शेवटी सामूहिक पसायदान म्हणत कार्यक्रम आटोपण्यात आला.