मुंबई (वृत्तसंस्था) फॉक्सकॅान प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये जात असताना सध्याचं राज्य सरकार काय करत होतं असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेना भवनमध्ये झालेल्या पदाधिकारी बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावरच होणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. वेदांता फॉक्सकॉनवर बोलताना ठाकरे म्हणाले की, गुजरात लहान भाऊ, प्रकल्प त्यांच्याकडे गेल्याचं त्यांनी म्हटले आहे. तसेच मविआ काळात हा प्रकल्प राज्यात येणार होता. मात्र, सध्याच्या सरकारला तो वाचवता आलेला नाही अशी टीका त्यांनी केली आहे. गुजरात लहान भाऊ आहे त्यांच्याकडे हा प्रकल्प गेला मात्र, त्यावेळी राज्य सरकार काय करत होतं असा प्रश्ऩदेखील ठाकरेंनी उपस्थित केला आहे. मविआमुळे हा प्रकल्प राज्यातून बाहेर गेला अशी टीका करण्याचं धाडसं कुणी करू नये अशी प्रतिक्रिया ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
शिवसेना भवनात आज उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या तयारीसंदर्भात आणि नेत्यांना महत्त्वाच्या सूचना करत आदेशही दिले. शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांनासोबत घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. शिवसेनेचा 21 तारखेला पदाधिकारी मेळावा होणार आहे. त्यासाठीही शाखा स्तरावर बैठका घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.