लखनऊ (वृत्तसंस्था) लखीमपूर खेरीमध्ये रविवारी घडलेल्या घटनेचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक जीप मागून शेतकऱ्यांना उडवताना दिसत आहे. हा व्हिडीओ काँग्रेसने ट्विट केला आहे. लखीमपूर खीरी इथला हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडीओ विविध राजकीय पक्षांकडून लखीमपूरमधला असल्याचा सांगत शेअर केला जात आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागून गाडी येते आणि जोरात धडक देऊन त्यांना चिरडते असं व्हिडीओमध्ये दिसतं. काँग्रेससह विरोधी पक्षांनी हा व्हिडीओ लखीमपूरमधला असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, याप्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. “लखीमपूर खीरीतील वेदनादायी दृश्य” असं काँग्रेसने म्हटलं आहे. मात्र या व्हिडीओमध्ये गाडी नेमकं कोण चालवत आहे हे दिसत नाही. मात्र आंदोलन करणाऱ्या पगडीधारक शेतकऱ्याला मागून धडक दिली जाते आणि गाडी त्याच्या अंगावरुन जाते हे या व्हिडीओमध्ये दिसतं.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं, ज्या आंदोलनात २ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राज्यातील विकासकामाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रिय मंत्री अजय मिश्र आले होते. त्यांना विकासकामाचं उद्घाटन केल्यानंतर एका कार्यक्रमासाठी बनवीरपूर गावात जायचं होतं. दरम्यान, इथं मंत्री येणार असल्याने कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी इथं एकत्र झाले, आणि काळे झेंडे घेऊन ते तुकुनिया परिसरात पोहचले. दरम्यान, यावेळी मंत्र्याच्या जाणाऱ्या गाड्यांच्या स्वॉर्डने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडलं. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा अभय मिश्रने हे कृत्य केल्याचा गंभीर आरोप, घटनास्थळी असेलल्या शेतकऱ्यांनी केला आहे. या दुर्घटनेत २ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला, संतापलेल्या शेतकऱ्यांनी ३ गाड्या जाळून टाकल्या, यूपीत हिंसाचार उफाळला, ज्यात आतापर्यंत ८ लोक मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे.