बीड (वृत्तसंस्था) जिल्ह्यातल्या आष्टीत विवस्त्र महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यातल्या वाळूजमध्ये जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचं समोर आले आहे. आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता सुरेश धस यांच्याशी संबंधित लोकांनी रविवारी (15 ऑक्टोबर) आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह ३ जणांविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नीला गुंडांच्या मदतीने आपली वडिलोपार्जित जमीन बळकावायची आहे, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. प्राजक्ता धस ज्या जमिनीवर दावा करत आहेत ती ६०-७० वर्षांपासून त्यांच्या कुटुंबाकडे आहे, असा दावा पीडितेने केला आहे.
या प्रकरणी बीडच्या आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता सुरेश धस, राहुल जगदाळे आणि रघु पवार यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५४, ३५४ ब, ३२३, ५०४, ५०६, ३५४ अ, ३४ आणि अनुसूचित जाती-जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहे.
तर संबंधित जागेचा वाद सोडवण्यासाठी भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस त्या ठिकाणी गेल्या होत्या. प्राजक्ता धस त्या ठिकाणी गेल्यानंतरही तो वाद वाढत गेला. त्यानंतर संपूर्ण प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी पत्नीवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे संपूर्ण प्रकरण खोटे असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त आज ‘दिव्य मराठीने दिले आहे.