जळगाव (प्रतिनिधी) म्हाडाच्या चार प्रवर्गांतील परीक्षांचे पेपर फोडण्याच्या आरोपाखाली अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला अॅड. विजय दर्जीला आरोग्य भरती घोटाळ्यातही (Health Recruitment scam) अटक करण्यात आली होती. तीन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर त्याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, टीईटी घोटाळ्यात (TET SCAM) बीडचा मुख्य संशयित राजेंद्र सानपला अटक केल्यानंतर सानप हा जळगावचा विजय दर्जी याच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी दोघांचे मोबाईलचे सीडीआर काढले असता दर्जी आणि सानप हे एकमेकाच्या संपर्कात असल्याचे फोन रेकॉर्डवरून उघड झाले होते. त्यामुळे सानपच्या अटकेनंतर पुणे पोलिसांनी दर्जीकडे लक्ष केंद्रित केले होते. काही दिवस सर्व माहिती गोळा केल्यानंतर दर्जीला २५ मे रोजी त्याच्या गोलाणी मार्केटस्थित ऑफिसमधून ताब्यात घेण्यात आले होते. कोर्टात हजर केल्यानंतर दर्जीला १ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
एक जूननंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. परंतू अवघ्या दोन दिवसानंतर विजय दर्जीला पुन्हा आरोग्य विभाग परीक्षेच्या घोटाळ्यात अटक करण्यात आली. त्याच्याकडून आरोग्य विभागच्या परीक्षेचे एका विद्यार्थ्याचे हॉल तिकीट मिळून आले आहे. न्यायालयने दर्जीला पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता तो न्यायालयीन कोठडीत आहे. दुसरीकडे आरोग्य भरतीतील गट क आणि गट ड च्या परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी 20 जणांना अटक केली होती. म्हाडा प्रमाणे आरोग्य भरती घोटाळ्यातही महत्त्वाचा सूत्रधार असलेले सानप बंधूपैकी राजेंद्र सानपच्या संपर्कात विजय दर्जी होता. म्हाडानंतर आता आरोग्य भरती घोटाळ्यातही विजय दर्जीचे नाव समोर आल्यामुळे तपासाला आणखी एक वेगळी दिशा मिळाली आहे. यातूनच विजय दर्जीसोबत असणारा जळगावचा आणखी एक व्यक्ती पुणे पोलिसांच्या रडारवर असल्याचे कळते.