अहमदनगर (वृत्तसंस्था) दिवंगत माजी केंद्रीय मंत्री व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आले. विखे पाटील यांच्या सहकार क्षेत्रातल्या कामाचे, जलसंवर्धन, ग्रामीण शिक्षणासाठी केलेल्या कामाचे यावेळी पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. प्रवरानगर, छत्रपती शिवाजी महाराज तसेच वीर विरांगणा कर्मयोग्यांच्या भूमीला मी वंदन करतो असे मराठीतून भाषणाला सुरुवात करत पंतप्रधान मोदींनी उपस्थिती मान्यवरांची मने जिंकली.
बाळासाहेब विखे-पाटील आयुष्यभर गाव, गरीब आणि शेतकऱ्यांसाठी राबले. त्यांचे आयुष्य भावी पिढ्यांना प्रेरणादायी आहे. विखे पाटील यांनी सहकारासाठी अथक प्रयत्न केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या अतिशय जवळून पाहिल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्या कष्टांमुळेच ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला. सहकारी चळवळ ही खरी धर्मनिरपेक्ष चळवळ आहे. ती कुठल्याच जातीची आणि कुठल्या ही धर्माची नाही. आतापर्यंत सर्व जाती आणि धर्मांना स्थान दिले आहे, असेही मोदींनी म्हंटले आहे.
विखेंच्या आत्मचरित्राला देण्यात आलेले ‘देह वेचावा कारणी’ हे नाव अत्यंत समर्पक आहे. विखेंच्या आयुष्याचे संपूर्ण सार या नावात आहे. सत्ता, राजकारणाचा वापर विखेंनी समाजाच्या कल्याणासाठी केला. त्यांच्यासाठी सत्ता ही लोककल्याणाचे माध्यम होते. देशात कुठेही ग्रामीण शिक्षणाची चर्चा नसताना त्यांनी ग्रामीण शिक्षणासाठी पुढाकार घेतला. अविरत प्रयत्न केले. प्रवरा संस्था उभारली. संस्थेच्या माध्यमातून तरुणांना रोजगार दिला. त्यांनी कायम समाजाच्या भल्याचा विचार केला, अशा शब्दांत पंतप्रधानांनी विखेंच्या कार्याचे कौतुक केले.