मुंबई (वृत्तसंस्था) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अखेरच्या एकदिवसीय सामन्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. या मॅचमध्ये भारतीय संघाने इंग्लंडला ७ रन्सने पराभूत करुन एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. इंग्लंडच्या याच पराभवावरुन भारताचा आक्रमक दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवागने इंग्लंडची खिल्ली उडवली आहे. खाली हात आये थे, खाली हात जाऐंगे, अशी टिप्पणी करत सेहवागने इंग्लंड संघाची खिल्ली उडवली आहे.
सॅम करनजवळ टॅलेंट आहे. त्याने अखेरच्या सामना जवळजवळ इंग्लंडला जिंकून दिला होता. परंतु भारताने बाजी मारली. शेवटी खाली हात आये थे, खाली हात जाऐंगे, असं ट्विट वीरेंद्र सेहवागने केलं आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनने जवळपास भारताचा विजय खेचून आणला होता. सॅक करनने एकाकी झुंज दिली. त्यामुळेच ३३० धावांचं भलंमोठं लक्ष्य देऊनही भारताला हा सामना केवळ ७ धावांनीच जिंकता आला. या सामन्यात सॅम करनने सर्वांचे श्वास रोखले होते. सॅम मैदानात आला तोपर्यंत इंग्लंडने मॅच गमावल्याचीच स्थिती होती. मात्र सॅमने ८३ चेंडूत ९५ धावांची जबरदस्त खेळी करुन, भारताच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. सॅम करन शेवटपर्यंत नाबाद राहिला, मात्र तो इंग्लंडला विजयापर्यंत पोहोचवू शकला नाही.
भारताने इंग्लंडला तिन्ही फॉरमॅटमध्ये पराभवाचं तोंड पाहायला लावलं. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ३-१ अशी मालिका जिंकली. ५ सामन्यांची टी ट्वेन्टी मालिका भारताने ३-२ अशी जिंकली. तर अखेरच्या निर्णायक मॅचमध्ये इंग्लंडचा ७ धावांनी पराभूत करत एकदिवसीय मालिका देखील खिशात घातली. विराटच्या नेतृत्वाखालील टीमने तिन्ही फॉरमॅटमध्ये आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं.
















