मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. तर १८ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे.
राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी आज, शुक्रवारी मतदान होत असून, राज्याच्या ग्रामीण भागाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांनी सर्व ताकद पणाला लावली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून ग्रामीण भागातील ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने या निवडणुकीचा कौल सत्ताधाऱ्यांसाठी महत्त्वाचा असेल. मतमोजणी सोमवारी होईल. राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका या राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढवल्या जात नाहीत. यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे समजत नाही. सर्वच राजकीय पक्षांकडून आम्हीच जास्त जागा जिंकल्या, असा दावा केला जातो. तसेच राजकीय पाया भक्कम करण्यासाठी सर्वच राजकीय नेते आपापल्या भागांमधील निवडणुकांमध्ये लक्ष घालतात. खासदारकी आणि आमदारकीसाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात असणे राजकीय नेत्यांसाठी आवश्यक असते. त्यामुळे या वेळीही सर्वच नेत्यांनी आपापल्या भागांमधील निवडणुका प्रतिष्ठेच्या के ल्या आहेत. कोरोनाकाळात ज्या गावपुढाऱ्यांनी बाहेरगावी राहणाऱ्या ग्रामस्थांना गावात प्रवेश नाकारला, त्याच पुढाऱ्यांवर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांपुढे पायघडय़ा घालण्याची वेळ आली आहे. परगावी राहणाऱ्या मतदारांनी मतदानासाठी यावे म्हणून मोटारींचीही सोय केली जात आहे.
नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच गावोगावच्या पंचायत निवडणुका जाहीर झाल्या. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एक मतही मोलाचे ठरते. मतदार यादीत नाव असलेल्या मात्र नोकरीधंद्यानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे मतदार यादीतील प्रत्येक नावाचा पाठपुरावा केला जात आहे. प्रत्येक मतदाराशी संपर्क साधून मतदानासाठी आर्जवे सुरू झाली आहेत. परंतु, हात जोडून मते मागणाऱ्या पुढाऱ्यांना मतदार आता त्यांच्या त्या वेळच्या वागणुकीचे स्मरण करून देत आहेत. १४,२३४ ग्रामपंचायती, ४६,९२३ प्रभाग १,२४,८१० जागा, उमेदवार : अडीच लाखांहून अधिक जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.